फ्रायडे फॉर फ्युचर (FFF) 
जागतिक पर्यावरण बचाव अभियान
२०-२८ सप्टेंबर २०१९ (पर्यावरण सप्ताह )

                                                                                                                                                                            महोदय,
आधी उन्हाने भाजून काढलं, आता पावसाने आणि महापुराने रडवलं. अर्धा भारत पाण्याविना तडफडतोय, तर अर्धा पाण्यामुळे. पूर असो की वणवा जगभर दर आठवड्याला एक मोठे संकट ही मालिका आता सुरू झाली आहे. याचं कारण एकच आहे. मानवाच्या हस्तक्षेपामुळे वाढलेलं वातावरणाचं  तापमान अर्थात  'ग्लोबल वार्मिंग' आणि यामुळे पर्यावरणाच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये झालेला बदल.  हे आता जगभर सिध्द झालेय. शास्त्रज्ञांनी उपाय करण्यासाठी आपल्या हाती फक्त पाचच वर्षे आहेत हा  निर्वाणीचा इशारा दिला आहे.
                                                                                                                                                                                  या पर्यावरण समस्येवर ठोस उपाय केले जावेत यासाठी लहान मुलांनी एक जागतिक लोकचळवळसुरु केली आहे ती अर्थात फ्रायडेज फॉर फ्युचर आणि fff या नावाने ओळखली जाऊ लागली आहे. 'ग्रेटा थनबर्ग' नावाच्या एका पंधरा वर्षाच्या मुलीने या लोकचळवळीची सुरवात केली. पर्यावरण समस्येवर ठोस काहीच उपाय केले जात नाहीत यामुळे अस्वस्थ असलेली ग्रेटा स्वतः २० ऑगस्ट २०१८ पासून सलग तीन आठवडे एकटीच स्वीडन संसदेसमोर जाऊन बसत होती. तिने मंत्र्यांना, खासदारांना निवेदने दिली. यानंतर दर शुक्रवारी तिने शाळाबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात केवळ तेरा महिन्यात एकशे सत्तर देशांतील पन्नास लाखाहून अधिक मुले उत्स्फूर्तपणे सहभागी झाली आहेत. या मोहिमेचा परिणाम असा झाला आहे की, पाच विकसित देशांनी 'राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी' जाहीर केली आहे. सातशे पंचाहत्तर महानगरपालिकांनी आणि सात हजार युनिव्हर्सिटी-कॉलेजनी युनो च्या पुढाकाराने 'पर्यावरणीय आणीबाणी' जाहीर केली. न्यूझीलंड ने जी.डी.पी. धारित अर्थसंकल्प बंद करत 'पर्यावरणपूरक मानवी कल्याण' यावर आधारित अर्थसंकल्पावर भर दिला आहे.
                                   
                                                                                                                                                                                        *विशेष चौकट*
दरम्यान महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर मध्ये आले असता छोटे लिडर्स सृष्टी शेट्ये, वेद शेट्ये, श्राग्वि (गुणगुन) मिश्रा, उदयन मिश्रा, आर्या उपाध्याय, प्रत्यूष उपाध्याय आणि वसुमित्र बकरे यांनी त्यांच्याशी पर्यावरण विषयी संवाद साधला. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. माननीय चंद्रकांतजी पाटील , मा. माननीय धनंजय महाडिक, देवस्थान समितीचे माननीय महेश जाधव यांचीदेखील या प्रसंगी भेट घेऊन पर्यावरण विषयक बाबींची संवाद साधला.
                                                                                                                        सर्व एकत्र आलो-तरच बदल घडवू शकतो या विचाराने जगभर सर्व पर्यावरणप्रेमी संघटना, एन.जी.ओ., शास्त्रज्ञ, नागरीक आपले मतभेद सोडून fff  मोहिमेत सामील होत आहेत.याचे कोणीही स्थानिक नेतृत्व नाही. मोहिमेचा एकच जागतिक चेहरा आहे पंधरा वर्षांची ग्रेटा थनबर्ग ! या मोहिमेमध्ये प्रत्येकजण उत्स्फूर्त लीडर आहे.सर्व एक झाल्यामुळेच प्रचलित व्यवस्था बदलाची सुरुवात झाली आहे. मानवासहित सर्व सजीव सृष्टी वाचविण्यासाठी जगभर सुरू असलेल्या "फ्रायडेज फॉर फ्युचर" या चळवळीचा जोर भारतात देखील दिसून आला आहे. भारतातील प्रमुख शहरात दिनांक २० सप्टेंबर ते २७ सप्टेंबर 'पर्यावरण सप्ताह' संप्पन्न होत आहे. या मध्ये कोल्हापूर जिल्हा देखील मागे नाही.
                                                                                                                                                                              आता पर्यंत कोल्हापूर मधील रेडिओलॉजिस्ट डॉक्टर असोसिएशन, के. आय. टी. इंजिनिअरिंग कॉलेज, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, ताराराणी विद्यापीठ, कमला कॉलेज, प्रायव्हेट हायस्कुल, शनिपार, प्रिन्स मराठा बोर्डिंग चे न्यू  कॉलेज, कॉलेज ऑफ आर्किटेक्ट, गर्ल्स हायस्कुल, गार्डन्स क्लब, उमेद फौंडेशन, वृक्ष प्रेमी ग्रुप, सावली फौंडेशन, सॅटर्डे क्लब कोल्हापूर ऊर्जा,  ज्ञानयोग मंदिरम, कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर संघ , सन सिटी सोसायटी, हिराश्री सोसायटी , सिद्धी हेरिटेज सोसायटी, दौलतराव निकम हायस्कुल, कागल तर इचलकरंजी येथील भगतसिंग उद्यान आरोग्य प्रेमी, गोविदराव हायस्कुल, आर्ट, सायन्स, कॉमर्स कॉलेज (ascc), व्यंकटराव हायस्कुल,  रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांचे  या चळवळीला पाठबळ लाभले आहे.
                                                                                                                                                                               'पर्यावरण सप्ताह' चा एक भाग म्हणून कोल्हापुर शहरातील माळी कॉलनी येथील ओरिएंटल इंग्लिश स्कुल, भोसलेवाडी येथील माझी शाळा, फुलेवाडी रिंगरोड येथील 'राजर्षि शाहू हायस्कुल' साने गुरुजी नगर परिसरातील 'संकल्प विद्यालय', 'देशमुख हायस्कुल', 'आदर्श प्रशाला', 'शिवाजी मराठा हायस्कुल' या शाळांनी सहभाग घेतला. कोल्हापुरी शेजारी ग्रामीण भागातून देखील मोठ्या प्रमाणात शाळांनी सहभाग घेतला यामध्ये 'विद्या मंदिर खटांगळे',  'श्रीराम हायस्कुल भागशाळा कोपर्डे' 'विद्यामंदिर अनुस्कुरा', 'विद्या मंदिर मोशी गावठाण' या ठिकाणी तर इचलकरंजी येथील कर्मवीर विद्यामंदिर, आण्णासो राजमाने हायस्कूल, रूई. माउली प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा इस्पुर्ली या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमाद्वारे शालेय परिसरात जनजागृती केली. या सर्व शाळांमधील सुमारे तीन हजारहुन अधिक विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला.
                                                                                                                                                                                 या अभियानाअंर्गत विविध उपक्रम दिनांक २० ते २८ सप्टेंबर दरम्यान  'पर्यावरण सप्ताह' मध्ये आयोजित आहेत. गुरुवार दिनांक २६ रोजी शालेय विद्यार्थ्यांची महामानवी साखळी साकारण्याचा मानस असून शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी दसरा चौक ते बिंदु चौक येथे सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महाविद्यालये, विविध संस्था, तसेच नागरिक यामध्ये सहभागी होणार आहेत. दर शुक्रवारी पर्यावरणविषयक खेळांचे आयोजन व जागरूकता मोहीम शाळा-कॉलेजमध्ये राबविली जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या साठी संस्था, मंडळे, सोसायटी यांच्या माध्यमातून विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे.
         
आपला कृपाभिलाषि,
fff  कोल्हापुर साठी                                                                                                                                                                 नितीन डोईफोडे ९५६१९३३७७१                                                                                                                                            सागर बकरे ७७४१०९१२२४
     
*FFF- Kolhapur Mission Statement*

fff ही मोहीम राबविताना आम्ही दोन कामांना प्राधान्य देत आहोत -
'पर्यावरण बदल' हा विषय सर्वांगाने जनतेला समजावून सांगून, त्याबद्दल जनजागरण करून,
१)  प्रत्येक नागरिकाचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची लोकचळवळ उभी करणे
२) पर्यावरणपूरक विकास व पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी प्रचलित व्यवस्था बदलाचा आग्रह धरणे

आमची कार्यपद्धती:

● आम्ही पर्यावरण विषयक जनजागरण मोहीम राबवतो.
● "पर्यावरण बदल: समस्या आणि उपाय" यावर शाळा, कॉलेज, विविध सामाजिक गट, संस्था, असोसिएशन, मंडळे, कॉलोनी, सोयायटी इ. सर्वत्र माहिती देत आहोत.
● आपला कार्बन फूटप्रिंट कमी करणे हे ध्येय! म्हणजेच सोपे करून सांगायचे म्हणजे प्रत्येक घराघरातून होणारे प्रदूषण कमी करणे.

* "स्वच्छ भारत" मोहिमेचे महत्त्व सांगणे व कचरा बाहेर न फेकण्याची प्रतिज्ञा घेणे
* ओला कचरा घरी/हॉटेलमध्ये कंपोस्ट करणे, सोसायटी/हॉटेलमध्ये गोबरगॅस प्लांट चे महत्त्व आणि प्रसार
* सुका कचरा वेगळा करणे (रिसायकल होण्यासाठी)
* प्रत्येक मुलाने घरी प्लास्टिकची रद्दी गोळा करावी(वर्तमानपत्राच्या रद्दीसारखी) व महिन्यातून एकदा ही रद्दी शाळेत जमा करणे. (कोल्हापूरचे आयुक्त यासाठी शाळांमधून यंत्रणा राबवित आहेत.)
* विजेचा कमीतकमी वापर करणे. LED सोबत वीज वाचवणारी उपकरणे वापरणे
* फ्रिज, TV, वॉशिंग मशीन, एसी,... अशा साधनांचा कमीतकमी वापर करणे. ज्या खोलीत कोणी नसेल तेथील लाईट-फॅन बंद करणे. हेच घरी, शाळा व सार्वजनिक ठिकाणी आवर्जून करणे.
* दैनंदिन जीवनात वापरात असलेली अनेक केमिकल्स, कॉस्मेटिक्स, साबण, शाम्पू, क्रीम्स,...सर्व पाण्याद्वारे पुढे जाऊन नदी नासवतात. यामुळे होणारे नुकसान आणि पर्यायी वस्तूंबद्दल जागृती पसरवणे.
* दर शुक्रवारी शाळा किंवा कोलेजबाहेर हाती पोस्टर धरून जागृती केली जाते.
* घरगुती आणि कंपनी, संस्था व सार्वजनिक ठिकाणी सौरऊर्जेचा वापर वाढवणे
* रेनवॉटर हार्वेस्टिंग चा प्रसार करणे
* सेंद्रिय शेतीचा प्रसार करणे
* कम्युनिटी किचन गार्डन, कम्युनिटी फार्मिंग चा प्रचार* अशा अनेक गोष्टींचा अनेक मार्गाने प्रचार चालू आहे.





*कर्बभार किंवा कार्बन फूटप्रिंट म्हणजे नेमके आहे तरी  काय? आणि ह्याचा वातावरणावर परिणाम होतो तरी कसा???*
                                                                                                                                                                             हे जागतिक हवामान बदल किंवा जागतिक तापमान वाढ यामधील योगदान मोजण्याचे एकक आहे.
कर्बभार किंवा कार्बन फूटप्रिंट म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा घटनेमध्ये, किंवा दर वर्षी एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा इमारतीद्वारे होणारे एकूण हरितगृह वायूंचे उत्सर्जन. 
अतिशीत प्रदेशांत हिवाळ्यातही काचेच्या बनवलेल्या हरितगृहांमध्ये वातावरण उबदार रहात असल्याने शेती करणे शक्य होते. काचेतून प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश आरपार जाऊ शकतो, पण हरितगृहात तयार झालेली उष्णता आरपार जाऊ शकत नाही. यामुळे आतली हवा उबदार रहाते, व वनस्पती वाढू शकतात. पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डायॉक्साइड व इतर काही वायू हीच भूमिका बजावतात. त्यामुळे पृथ्वी उबदार आहे, आणि तिच्यावर जीवसृष्टी अस्तित्वात आली आहे. मात्र गेल्या काही शतकांत मुख्यतः खनिज इंधनांच्या वापरामुळे व इतर काही औद्योगिक प्रक्रियांमुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान वाढले आहे, आणि परिणामस्वरुप आपल्याला जागतिक हवामान बदलाला तोंड द्यावे लागते आहे.
जागतिक हवामान बदलाला वेगवेगळे हरितगृह वायू कारणीभूत आहेत, आणि त्या सर्वांची जागतिक तापमानवाढ करण्याची क्षमता वेगवेगळी आहे. उदा. मिथेन हा हरितगृह वायू कार्बन डायॉक्साइडच्या तुलनेने २१ पट अधिक धोकादायक आहे. म्हणजेच एखाद्या प्रक्रियेतून जर १ टन मिथेन वायू वातावरणात जात असेल, तर त्याचा परिणाम २१ टन कार्बन डायॉक्साइडच्या समकक्ष आहे. याच धर्तीवर वेगवेगळ्या हरितगृह वायूंची कार्बन डायॉक्साइडशी असलेली समकक्षा वैज्ञानिकांनी संशोधनातून मिळवली आहे. याचा वापर करून, एखाद्या प्रक्रियेत जरी वेगवेगळे हरितगृह वायू बाहेर पडत असले, तरी कार्बन डायॉक्साइड समकक्ष एकूण किती वायू बाहेर पडला हे काढता येते. हाच त्या प्रक्रियेचा कर्बभार असतो. उदा. एखाद्या प्रक्रियेत २ टन कार्बन डायॉक्साइड व १ टन मिथेन बाहेर पडत असतील, तर त्या प्रक्रियेचा कर्बभार २ अधिक (१ गुणिले २१) म्हणजेच २३ टन कार्बन डायॉक्साइड समकक्ष आहे. असे म्हटता येते.

Comments

Popular posts from this blog