...नाहीतर आपला पण डायनासोर होईल

कल्पना करा, चीन सारख्या मोठ्या देशाने भारतावर आक्रमण केले आहे, काय घडेल? आणीबाणी जाहीर होईल आणि धर्म, जात, पंथ, पक्षीय राजकारण, उच-नीच, श्रीमंत-गरीब, सर्व भेद विसरून 135 करोड भारत वासी एक होतील आणि पूर्ण देश सर्व ताकद एकवटून युद्धास सज्ज होईल, कारण आपल्याला कोणाचे गुलाम व्हायचे नाही.

मित्रहो,
अशा युध्दापेक्षा शेकडो पट मोठे संकट
आज मानवजातीवर घिरट्या घालत आहे.
भारतासहित सर्व राष्ट्रांनी 'पर्यावरणीय आणीबाणी' जाहीर करून युद्धपातळीवर उपाय करायला हवेत, कारण सर्वशक्तिमान डायनोसॉर जसे पृथ्वीवरून अचानक नष्ट झाले, तसे मानवदेखील नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   जागतिक तापमानवाढ व हवामानबदल हे हाताबाहेर जाण्याच्या बेतात आहे. 5 नोव्हेंबर 2019 रोजी 153 देशांच्या 11258 शास्त्रज्ञांनी क्लायमेट इमर्जन्सी अर्थात आणीबाणी जाहीर केली आहे. मागील वर्षी 20 हजार शास्त्रज्ञांनी असाच इशारा देऊनदेखील जगभरातील सर्व सरकारे-उद्योगपती यांनी नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केले. गेली 30 वर्षे ते हेच करत आले आहेत. खरी शास्त्रीय आकडेवारी जाहीर केली जात नसल्यामुळे व स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर झाल्याने जगभर शास्त्रज्ञ रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

गेले हजारो वर्षे असलेले निसर्गाचे संतुलन पुरते बिघडले आहे, माणसाच्या मागील 250 वर्षांच्या चुकीच्या विकासाच्या संकल्पनांनी!
डोंगर कापले जात आहेत, नद्या नासवल्या आहेत; मृत झाल्या आहेत. जंगले तर मिनिटाला 150 एकर ह्या वेगाने कापली जात आहेत. ह्या घडीला जगभरातील अनेक मोठ्या जंगलांना आगी लागत आहेत किंवा लावल्या जात आहेत. ऑस्ट्रेलिया चारही बाजूने पेटला आहे. दक्षिण आफ्रिकेतील काँगो व इतर देशांतील जंगले जळत आहेत. दक्षिण अमेरिकेतील समृद्ध घनदाट अमेझॉन जंगलाला 84000 ठिकाणी आगी लावल्या आहेत. उत्तर अमेरिकेतील कॅनडा आणि कॅलिफोर्नियातील जंगल हे कित्येक महिने जळत आहे. सैबेरियातील 4 लाख एकर जंगल जळून खाक झाले आहे.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने जाहीर केलेल्या अभ्यासानुसार चार लाख अणुबॉम्ब फोडल्यावर निर्माण होणारी उष्णता दररोज आपण वातावरणात सोडत आहोत. हो दररोज चार लाख! यामध्ये प्रत्येक अणुबॉम्ब हा हिरोशिमा क्षणात बेचिराख करणाऱ्या अणुबॉम्बच्या क्षमतेचा मानला आहे. समुद्र यातील अधिकांश उष्णता शोषून घेते असल्याने आपण वाचलो आहोत. पण त्यामुळे समुद्राचे तापमान वाढत आहे. ह्यामुळे बर्फ वेगाने वितळत आहे. 21 व्या शतकाच्या अखेरीस वितळेल असा अंदाज असलेले बर्फ जून 2019 लाच वितळले. समुद्राखालील बर्फाचा वितळण्याचा वेग 100 पटीने वाढला आहे. तातडीने उपाय नाही केले तर समुद्रातील पाण्याची पातळी वाढून किनाऱ्यालगतची मुंबई, कोलकता सहित सर्व शहरे लवकरच पाण्याखाली जाणार आहेत.

वितळणाऱ्या बर्फाखालून मुक्त होणारे व्हायरस व वाढणाऱ्या तापमानामुळे विविध फंगस यामुळे साथी चे रोग पसरू लागलेत. ज्या रोगांवर आपल्याकडे कोणतेही औषध नाही. ह्यामुळेच जागतिक आरोग्य संघटना (WHO) व इतर 77 मोठ्या संस्थांनी नुकतीच 'जागतिक आरोग्य आणीबाणी' जाहीर केली आहे.
आता इथून पुढे तापमान सतत वाढते राहणार आहे. ते आता अपरिवर्तनीय झाले आहे. कार्बनडाय ऑक्साईड ची धोक्याची पातळी आपण 2013 सालीच ओलांडली असून आपण आता रेड झोन मध्ये चालत आहोत. असे विविध टिपिंग पॉईंट्स आपण पार करून अपरिवर्तनीय बदल आपण निसर्गात करत आहोत. बर्फाखालील मिथेनचे साठे जर मोकळे झाले तर अनर्थ होणार आहे. कारण मिथेन हा कार्बनडाय ऑक्साईडपेक्षा 23 पट घातक आहे. ओझोन-थर नष्ट होण्याचे कारण 1988 साली शोधून काढणाऱ्या, हार्वर्ड विद्यापीठाच्या जेम्स अँडरसन या शास्त्रज्ञाने निर्वाणीचा इशारा दिला आहे, "पुढील पाच वर्षांत मोठे बदल नाही केले तर येत्या 20 वर्षांत मानवजात नष्ट होऊ शकते". म्हणूनच जगभर शास्त्रज्ञ रस्त्यावर उतरले आहेत आणि आपल्याला ओरडून सांगत आहेत," आतातरी जागे व्हा!" कारण
उष्मालाटा, जंगल-वणवे, अतिवृष्टी, ढगफुटी, अॅसिडरेन, महापूर, दिर्घदुष्काळ, भूस्खलन, वादळे, चक्रीवादळे,... या सगळ्यांची संख्या व तीव्रता जगभर वाढत चालली आहे. एकामुळे दुसरे संकट, त्यामुळे तिसरे,..अशी संकटांची मालिका सुरू झाली की आपण त्यातून सावरू शकणार नाही...आणि सर्व नष्ट होताना बघणे फक्त हाती राहील.

या अंधकारमय स्थितीत काही आशा आहे का?
नक्कीच आहे!
एकतर हाती 5 वर्षे आहेत. कठोर उपाय केले तर सर्व परिस्थिती पालटवता येईल. पण जगातील सर्व सरकारे फार अल्प उपाययोजना अत्यंत धीम्या गतीने करत असताना हे कसे शक्य आहे? कारण 40 वर्षे सर्व शास्त्रज्ञ-पर्यावरणवादी संघटना सांगत असून जर हे लोक ऐकत नाहीत तर आपण एकटे काय करणार? अशा निराशेने ग्रासलेल्या असहाय्य अवस्थेत एका चिमुकल्या शाळकरी मुलीने आशा जागृत केली आहे आणि प्रकाशवाट दाखवली आहे. ऑगस्ट 2018 मध्ये  स्वीडन देशाच्या संसदेसमोर तिने धरणे धरले. आठवडे उलटले कोणी लक्ष दिले नाही. पण सोशल मीडियामुळे बातम्या पसरल्या. संकटांची मालिका सुरू आहेच. त्यामुळे बघताबघता 13 महिन्यातच 174 देशांतील 72 लाख लोक आज तिच्या आंदोलनात सामील झाले आहेत. "सायन्सचे व शास्त्रज्ञांचे ऐका", अशी त्यांची मागणी आहे. "घराला आग लागली आहे, तर वर्षानुवर्षे नुसत्या परिषदा काय भरवताय? नुसती आश्वासने नकोत, कृती हवी. प्रत्यक्ष उपाय घडताना दिसेपर्यंत दर शुक्रवारी शाळाबंद आंदोलन चालूच राहील", असे ही मुले म्हणत आहेत. "आम्हाला भविष्य उरणार नसेल तर शाळेत जाण्याला अर्थ काय आहे?"

लहान मुलांचे हे जनआंदोलन हीच आता एकमेव आशा उरली आहे. कारण शास्त्रज्ञ व पर्यावरणवादी संघटनांनी इतर सर्व मार्ग गेल्या 30/40 वर्षांत अनुसरून देखील काहीच उपयोग झालेला नाही. पण मुलांच्या ह्या 'फ्रायडेज् फॉर फ्युचर' अर्थात 'एक शुक्रवार भविष्यासाठी' ह्या मोहिमेमुळे, राजकारणी-उद्योगपती यांची कोणालाही दाद न देणारी पोलादी चौकट वितळू लागली आहे. 23 देशांनी 'राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी' जाहीर करून धोरणांमध्ये बदल सुरू केला आहे. न्यूझीलंडने तर जीडीपी आधारित अर्थव्यवस्था बंद करून 'पर्यावरणपूरक मानवी कल्याण' यावर सर्व विकासाची धोरणे नियोजित केली आहेत.
सर्वात आशादायक बाब ही आहे की, जगभरातील अहिंसात्मक आंदोलनांच्या अभ्यासातून हे सिद्ध झालेय की, केवळ 3.5% लोक एक होऊन रस्त्यावर उतरले की कोणताही मोठा बदल घडून येतो. खरे तर सर्वांनी एक होऊन निसर्गाचे संतुलन साधण्यासाठी प्रयत्न करायची गरज असताना केवळ 0.1% लोकांची ताकद उरलेल्या 99.9% लोकांना जागे करण्यातच खर्ची पडत आहे. हे दुर्दैवी आहे. मानवी हव्यास, चंगळवाद चरमसीमेला पोहचला आहे.

भारताने 'राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी' का जाहीर करायला हवी?

1)शतकातून एखादवेळी होणारी ढगफुटी ह्या मान्सूनमध्ये भारतात शेकडो ठिकाणी झाली. लाखो लोक पूरग्रस्त व अब्जावधी रुपयांचे नुकसान! पुरामुळे सुपीक शेतातील मातीचा वरचा अनमोल थर वाहून जात आहे.

2) महाराष्ट्रात ह्या मौसमात सव्वा दोन कोटी एकरवरील पिके नष्ट झाली. देशभरातील आकडेवारी खूप मोठी निघेल. सरकारकडून जाहीर झालेली मदत एकरी 3 ते 6 हजार! ज्या एकरातील पिकामुळे घरी लाख, दोन लाख येणार होते व त्यामुळे वर्षभर घर चालणार होते त्यांच्या आयुष्याची होणारी फरफट डोळ्यांपुढे आणून बघा. देशभरात हेच चित्र आहे.

3) 2018 साली भारतात 485 ठिकाणी उष्मा लाटा आल्या, 2010 साली फक्त 21 ठिकाणी उष्मालाटा आल्या होत्या. त्या दरवर्षी वाढत आहेत. दोन शहरात तापमान 50℃ च्या पार गेले. उष्मालाटांमुळे दरवर्षी शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत.

4) भारतात आजमितीला जल-जमीन-वायुप्रदूषण चरमसीमेला पोहचले आहे. सरकारी रिपोर्टनुसार देशाची 30% सुपीक जमीन वाळवंटीकरणाकडे झुकली आहे. देशाची अन्नसुरक्षा धोक्यात येणार आहे. कारण सागरी प्रजाती देखील वेगाने नष्ट होत आहेत. शेती व मासेमारीवर अवलंबून असलेल्या करोडो लोकांचा रोजगार व आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मोठ्या सामाजिक असंतोषाच्या शक्यतांचे इशारे अभ्यासकांनी दिले आहेत. 

5) ह्या वर्षी अर्ध्या देशात महापुर थैमान घालत असताना 60 कोटी लोक पाण्याविना तडफडत होते. देशात व  प्रमुख 21 शहरात संभाव्य भीषण पाणीटंचाईचा निती आयोगाचा अहवाल आहे.

6) वायुप्रदूषणामुळे दर मिनिटाला भारतात एका बालकाचा मृत्यू होत आहे. ह्या वायूंचे नॅनोकण श्वसनाद्वारे फुफ्फुसात व तेथून रक्तात मिसळून प्रत्येक अवयवात ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे डायबेटीस, हार्ट अटॅक, मिसकॅरेज ते अगदी कँसरपर्यंतचे सर्व आजार वाढले आहेत. ह्या सर्व आजारांमध्ये वायुप्रदूषणाचा मोठा सहभाग नुकताच सिद्ध झाला आहे.

7) दरवर्षी सैंड स्टॉर्म, वादळांमुळे शेकडो मृत्यू होत आहेत. फणी, वायू, क्यार या चक्रीवादळांतून सावरत असतानाच बुलबुल चक्रीवादळाने 23000 कोटी रुपयांचे नुकसान केले आहे.

8) 2018 साली जमिनीवरील वादळे
उष्मालाटा, अतिवृष्टी, ढगफुटी, अॅसिडरेन, महापूर, दिर्घदुष्काळ, भूस्खलन, वादळे, चक्रीवादळे,... या संकटांची मालिका भारतभर वाढली आहे.

9) यामुळे झालेले नुकसान काही लाख कोटी रुपयांचे आहे. ज्यांनी परिवारातील व्यक्ती गमावला त्यांचे नुकसान मोजता येण्यापालिकडे आहे. ह्या परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारला करावा लागणारा खर्च हा देखील अवाढव्य आहे. अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण हा दरवर्षी वाढत जाणार आहे, कारण ही संकटे, त्यांची तीव्रता व त्यामुळे होणारे नुकसान हे दरवर्षी वाढतच जाणार आहे. देशभर करोडो संसार ह्या संकटांमुळे व वाढत्या आजारांमुळे उध्वस्त होत आहेत.
देशाच्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात भूकंप घडवणाऱ्या, देशाच्या प्रत्येक नागरिकावर अनिष्ट परिणाम करणाऱ्या, 'जागतिक तापमानवाढ व हवामानबदल' नावाच्या संकटावर मात करण्यासाठी, 'राष्ट्रीय पर्यावरणीय आणीबाणी' जाहीर करून युद्धपातळीवर उपाय करण्याची नितांत गरज आहे. याला पर्याय नाही.

खरे तर सर्व देशांनी मिळून हे करायला हवे, कारण निसर्गाला देशांच्या सीमा मान्य नाहीत. 'पर्यावरणपूरक जीवनशैली व समृद्ध अर्थव्यवस्था' याचा 5000 वर्षांचा समृद्ध अनुभव भारताकडे आहे. ह्याबाबतीत भारत जगद्गुरू नक्कीच बनू शकतो.

नितीन ज्ञानेश्वर डोईफोडे
फ्रायडेज् फॉर फ्यूचर-कोल्हापूर
9561933771




Comments

Popular posts from this blog